16903155_1322550214488631_5352163555239246236_o.

आज 388 व्या शिवजयंतीच्या निमीत्ताने गडवाट परिवार आणि शिवसहयाद्री दुर्गसंवर्धन संस्थेने आयोजिलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मला निमंत्रीत केले होते. त्याचा हा संक्षिप्त वृतांत …..

आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले सर्व दुर्ग प्रेमी……

आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे कारण महाराष्ट्राचे दैवत आणि आपले श्रध्दास्थान श्री. छत्रपती शिवजी महाराजांचा जन्म दिवस आणि त्याच अनुषंगाने शिवसहयाद्री दुर्गसंवर्धन संस्थेच्या भगीरथ प्रयत्नाने उभारलेल्या या संतोष गडावरील, त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी गडवाट या परिवाराने आयोजित केलेला हा कार्यक्रम होय.

दुर्ग, गड- कोट किल्ले आणि लेणी हे माझे पहिले प्रेमी. सातपुडा ते सहयाद्री आणि सहयाद्री ते हिमालय हा माझा दुर्ग प्रवास नेहमीच चालू असतो. आमचे परममित्र आणि सर्वांचे लाडके श्री. रवी पवार यांनी मला काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून मला निमंत्रण दिले होते आणि मी त्यांना तात्काळ हो म्हणालो . कारण दुर्ग, गड- कोट किल्ले आणि निसर्ग हे माझे विक पॉईंट असून माझे दुसरे घरच आहे. आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण म्हणजे माहेरचाच आहेर आहे आणि ही माझ्या करीता सन्मानाची बाब आहे.

तसं बघायला गेले तर आपल्या आयुष्यात Trek ची सुरुवात कशी होत असते? की आपले मित्र trek ला जायला निघतात आणि आपल्याला विचारतात ‘येणार का Trek ?’ आणि मग आपणही त्यात सामील होतो. हळू हळू आपण अनेक किल्ले पालथे घालतो. लहानपणीचा शिव छत्रपतींचा इतिहास पुन्हा नव्याने अभ्यासला जातो.याच प्रवासात अनेक शिवप्रेमी, दुर्ग प्रेमी, इतिहास तज्ञ अशी अनेक मोठया मनाची दिग्गज मंडळी भेटतात. आपल्याला हळू हळू समजायला लागतं की ही मंडळी समाजासाठी व देशासाठी निस्वार्थ भावाने सकारात्मक कार्य करत आहेत. त्यांचा हेवा वाटून आपणही काही तरी करावं, या कार्यात सामावून जाव अशी मनापासून इच्छा निर्माण होते. आपण Trek करतो किंवा Photoghery करतो, ते स्वता:च्या आनंदासाठी. पण आपण एखाद काम इतरांसाठी करतो तेही निस्वार्थ भावाने , तेंव्हा त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान हे वेगळंच असतो. त्याची तुलना कशाशीही होवू शकत नाही.

आपण किल्ल्यावर किंवा गडावर गेल्यावर तेथील पडझड पाहून आपणास दु:ख होते आणि खेद व्यक्त करुन सरकारला दोष देतो. पण या किल्ल्यावरचा प्रत्येक दगड अन दगड काहितरी सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. त्या मागे इतिहासाच्या गतवैभवाच्या पाउलखुणा लपलेल्या असतात, पूर्वजांच्या अफाट अशा परक्रमाचे ते साक्षीदार असतात. दुर्गमहर्षी ‘प्रमोद मांडे’ सर म्हटलेच आहेत की आपल्या गडकिल्ल्यांची Expiry Date कधीच संपली आहे. पण समाजात काही मंडळी असतात जी किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि जपणूकी साठी नुसतं समाजाला, सिस्टीमला आणि सरकारला दोष न देता स्वता: त्यासाठी सकारात्मक पाऊले उचलतात. कारण याच किल्ल्यांमुळे आपण आज टिकून आहोत, यांच्याच मुळे आपण आहोत. ही मंडळी म्हणजेच दुसरे कोण नाही तर आपली ‘शिवसहयाद्री दुर्गसंवर्धन संस्थां’ होय. साधा दीड वर्षांपूर्वीचा संतोषगड आणि आजचा संतोषगड यात प्रचंड सुधारणा जाणवली. प्रत्येक पावलोपावली या गोष्टीचा प्रत्यय येतो. ब-याच दा काही मंडळी भावनेच्या आवेषात अशा कार्यांना सुरुवात तर जोशपूर्ण करतात , पण त्यांच्या कार्यात सातत्य मात्र नसते. पण रवी पवार संतोषगडाच्या कार्याचे अपडेट नेहमीच शेअर करीत असतात. या संस्थेच कार्य आणि त्यांचे अफाट कष्ट हे आपल्यासाठी एका प्रकारचे रोल मॉडेल आणि प्रेरणादायी आहे.

आज या व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून मला निमंत्रित केले, या ठिकाणी माझ्यापेक्षा वयाने, कर्तुत्वाने आणि कार्याने बरीच मोठी व दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. त्यांच्यात मला समाविष्ठ करुन आपण माझा खूप मोठा सन्मान केला आहे. (कालपर्वापर्यंत मी ही आपणासह भटकंतीच्या प्रवासात, या कार्यात आणि अनेक कार्यक्रमात खांदयाला खांदा लावून व्यासपीठाच्या खाली असायचो पण आज अचानक तुम्ही मला व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बसवाल असे कधीच वाटले नव्हते.) कारण सदरचे कार्य करतांना मला कधीच आपण काही जगावेगळ करीत आहोत याचे भान नव्हते. म्हणूनच मी कालही, आजही आणि उदयाही एक सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणूनच तुमच्या सोबत असेन.

आपण शिवजयंतीचा हा कार्यक्रम वर्षातून फक्त एकदाच साजरी करीत असतो. पण या संतोषगडावर शिवसहयाद्री दुर्गसंवर्धन संस्थेचे कार्यकर्ते हे दरआठवडयाला येतात तसेच दररोज कोणीना कोणी येवून त्यांचे हे कार्य कायमस्वरुपी सुरु असते, त्यामुळे ही मंडळी दररोज शिवजयंती साजरी करतात असतात असे मला वाटते. आणि यांचा आदर्श ठेवून आपणही त्यांच्या पावलावर पाउल ठेवून रोजच शिवजयंती साजरी केली तर खरी शिवशाही आणि स्वराज्य आपणास भेटल्यावाचून राहणार नाही.

प्रथमतः प्रमुख पाहुणे म्हणून माझा सन्मान केल्याबददल संयोजकांचे आभार तसेच या कार्यक्रमाचे नियोजन, मांडणी आणि संकल्पना यासाठी गडवाट परिवार आणि शिवसहयाद्री दुर्गसंवर्धन संस्थेने घेतलेल्या श्रमाचे आपण कौतुकच करायला हवे. कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध जाणकार मंडळींची ओळख, तसेच अनेक दुर्गप्रेमीची भेट आणि त्यातून झालेली वैचारिक देवाण घेवाण, श्रमदानासह एक आगळी वेगळी शिवजयंती साजरी होवून दिवस सत्कारणी लागला.

आजपर्यंत अनेक ठिकाणी शहरात आणि गावात विविध पध्दतीने शिवजयंती साजरी होताना दिसली, पण महत्वाचे म्हणजे त्यात मी कधीही शिवाजी महाराज अनुभवले नाही, याठिकाणी मात्र मी आज पहिल्यादाच आपल्यामुळे ख-या अर्थाने शिवजयंतीच साजरी करु शकलो, अनुभवू शकलो. कारण त्यात मला हरवलेले शिवाजी महाराज मिळाले.

.

असलो वंशज जरी पाषाण युगाचे

आहे भान आम्हा आजच्या जगाचे ।।

आहोत मावळे आम्ही शिवरायांचे

आचरण करीतो मनाच्या श्लोकांचे ।।

गातो पोवाडे आम्ही शिवइतिहासाचे

संचरण होते मनी वीर रसाचे ।।

करीतो जतन आम्ही गडकिल्ल्यांचे

होवून किल्लेदार या महत्कार्याचे ।।

वाचवू ठेवा अनमोल हे भुतकाळाचे

घडवू शिलेदार पुनच्छ स्वराज्याचे ।।

त्रिवार मुजरा अन अखंड स्मरण शिव शाहीचे । 

तिच जिजाऊ, शिवमाता अन स्वमातेचे ।।

होवून नतमस्तक अन शत-शत नमन या भारत भूमीचे ।।

 .

जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद
.
– श्रीकांत
.

16903520_1420187441366708_6886260325240679661_o

गडवाट – शिवजन्मोत्सव सोहळा २०१७

गडवाट आणि शिवसह्यद्रि परिवार

Photo by –Vishal Laxman Sawant

 

 

_______________________

 

Join Me on FACEBOOK –

 

_______________________