1 IMG_6759-Final W O Ppl-4  75

 

गोष्ट होती परवाचीच,

              उष्मा होता नेहमीचाच,

                          वेळ होती दुपारचीच,

                                असाच बसलो असतांना अचानक,

              कुठुन तरी कानी गाणी येते अचूक

             ‘श्रावणात घन निळा बरसला’

             आणि काय योगायोग, मनातले आणि आकाशातले ढग का दाटून येती अचानक कधी सहयाद्री, कधी हिमालय आणि…. आणि तर कधी तिच्या आठवणींच्या या घननीळयात गुंतून जावून स्वप्नात…..  राहिले काम हातचे आणि मन मोकळे झाले कागदावर. होती सोबत शब्दांची आणि अश्रू होते शाईचे.

             नुकत्याच वसंतोत्सवाची सांगता झाल्यावर एप्रिल – मे च्या वैशाख वणव्यात ओसाड रखरखीत टेकडया व कातळकडे विविध उष्ण रंगांच्या छटांनी ओसंडून वाहतात. सुर्याच्या अंगाऱ्याचे रुपांतर धरणी पिवळा, तांबडा, नारिंगी अशारंगांच्या स्वर्ण फुलात करते. बोरं, चिंच, जांभूळ व करवंद अशा रानमेव्याने भरगच्च असलेली राने, डोंगर दऱ्या आणि पावसाळयाची वर्दी देत सुरु झालेला काजव्यांचा प्रकाशोत्सव आणि मृगाची चाहूल देणारे ढग गरजतात. उष्ण झळा सोसून, स्वत:हा झीजुन अंगभर फुलणारी धरणी येणाऱ्या ऋतुच्या आगमनाच्या स्वागता साठी श्रुंगाराने धडपडत असते. धरती आणि या मनाला ही फुलवणाऱ्या, अशा लावण्याचा आस्वाद घेण्यासाठी वैशाखातील तिव्र झळा सोसत आपली पाउले डोंगर दऱ्या व जंगलाकडे नकळत वळतात.

 

झाला असहय उकाडा मेचा

कधीतरी अचानक सरी येती वळवाच्या

मातीचा तो अव्दितीय सुगंध

आणि रपरपणारे थेंब बेधुंद

येतो मृगाचा बहार घेवून जून

घेते धरणी येथेच्य भिजून

 

              मग सुरु होतो संथपणा मनाचा आणि पावसाचा, आषाढ वारीची ओढ लागते. सहयाद्रीचा हिरवा संथपणा सोडून कैलासाच्या हिमालयाची आठवण होते. कधी पाउस तर कधी हिम असे त्याचे रुप निराळे असते. या जून महिन्याती हिमालयाची ओढ मला सालाबाद प्रमाणे कायमची आणि नेहमीचीच !

              जूलै ऑगस्टची सुरुवात होते दणक्यात, धोधो पाउस सुरु होतो. छत्रींची डागडुजी होते, भात खाचरे तुडुंब भरतात, नदी नाले धबधबे ओसंडून वाहु लागतात. याच वातावरणात ट्रेकचे नवनवे बेत ठरतात. कधीही न बाहेर पडणारे आपोआपच मार्गस्थ होतात. मग घाट, कधी वाट तर कधी कातळ असा काहिसा कार्यक्रम ठरतो.

              सप्टेंबर म्हणजेच श्रावण आणि या श्रावणाचे मी काय वर्णन करावे ‘सिर्फ नाम ही काफी है!’ श्रावण व सहयाद्री म्हणजेच दिवाळी, जसे जुन महिना म्हणजे बालपणीचा हट्ट, सप्टेंबर म्हणजे तारुण्याचे सौंदर्य. मग आठवडयाच्या सुटीचे दोन दिवसही कमी पडतात आणि असे वाटते की हे क्षण या ठिकाणीच स्तब्ध व्हावे आणि तारुण्याच्या उत्साहात कायमचे दंगुन जावे. अचानक बुधवारी रात्री मित्राचा फोन येतो, दोन दिवसांच्या दांडीचे कारण घडते आणि चारदिवसांचा अचानक बेत ठरतो. सहयाद्रीच्या ओढीने व्याकूळ झालेल्या या मनाला स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो आणि पुर्वीचे ट्रेकचे दिवस आठवतात. आधीच्या काळात बऱ्याचदा दोन दोन दिवसात अनेक ठिकाणे होत असायचे पण आता असे होत नाही. चार दिवसही एकाच गडावर कमीच पडतात कारण हाच तो अचूक वेळ असते जो श्रावण आणि सहयाद्रीचा खेळ असतो. तना – मनाला हा स्वर्ण क्षण वाया घालवावयाचा नसतो. कधी सोबती असतात, तर कधी मी एकटाच पाठीला सॅक अडकवुन, बिनधास्त बाइकला किक मारून आणि सहयाद्रीच्या ओढीने भटकायला निघतो. बऱ्याचदा रात्री प्रवास करुन इच्छित स्थळी पोहोचता पोहोचता पहाट होते. पण त्या प्रवासात अडचणी अनेक, द्राविडी प्राणायाम किंवा मिळेल त्या साधनाने, लक्षाकडे पोहोचत असतो. कधी ट्रक्टर, कधी बस, कधी वडाफ, कधी टमटम, बऱ्यादा जिपच्या टपावर बसून आसमंतात समरस होवून प्रवास घडतो.

              झुंजू मुजू होवू लागते, शाळकरी मुलांची शाळेची लगबग जाणवते. दुधवाला गवळी एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात दुधाचा कॅन सकट सायकलची कसरत करीत चिखलातून वाट काढत असतो. बस थांब्या पाशी चाकरमाने आपल्या कामावर जाण्याच्या बसची वा जीपची वाट पहात थांबलेली पण एकमेकांत गुंतलेली असतात. एखादया टपरीवर चहाचे सुरके घेत म्हातारी / वयस्क मंडळी पेपरातल्या एखादया राजकीय विषया वादविवाद करत असतात. एखादया छपराखाली तांब्याच्या बंबामध्ये आंघोळीचे पाणी तापत असते. भिजलेल्या लाकडाचा जळणारा धुर आणि वास आपलेपण दाखवतो. तिकडे काही लहान शेंबडी पोरं पाण्याच्या डबक्यात कागदी बोटी सोडण्यात गुंतलेली असतात. धनी आपल्या बैलासोबत शेता वर निघालेला असतो. त्यातच आमचा गावात अनोळखी प्रवेश होतो आणि सर्वांच्या कुतुहलाचा विषय बनतो. हातात कॅमेरा पाठीवर सॅक मग सुरु होतो शंकाचा प्रवास कुणी पत्रकार, कुणी छायाचित्रकार तर अजुन कुणी नाना प्रश्न विचारत भंडावून सोडतात. सकाळचा असा हा विलक्षण भारत अनुभवत गरमागरम चहा, पाववडा, बटाटा वडा तर कधी पोहे आणि रेनकोट जरी असलातरी धुक्याची चादर पांघरण्यासाठी तो मुददामच घरी ठेवून, तीन चार दिवसाचे बिऱ्हाड खांद्यावर घेवून स्वारी निघते ती चिंब ओल्या पाऊल वाटेवर, ‘Range नसलेल्या लांब Range मध्ये’.

 

2 IMG_6639-Edit 40 we

              सप्टेंबर मध्ये आजेाबा, घनचक्कर, कळसुबाई, हरिशचंद्रगड, कासपेक्षा ही भन्नाट अशी कोयना, चांदोलीतील निर्जन पठारे रान फुलाच्या पुष्पोत्सवात दंगुन जातात. कधी लाल, तर कधी पिवळी, निळी, जांभळी, अशी फुले जणू हिरव्या गालीच्यावर माणिक मोतींची रास ओसंडलेली भासते. रानातल्या पाऊल वाटेवर अशा फुलांचा सडा जणू आकाशातले तारेच अंगणी उतरलेले भासतात. पिवळसर सोनकी हि पिवळया रंगांची मुक्त उधळण करते तर दर सात वर्षानी बहरणारी कारवी लाजत मुरडत बहरते जशी पृथ्वीवर जणू निलांबरीच ती भासते. ही हसरी सारी फुले उनाड वाऱ्यासह डोलत असतात आणि त्यांच्या मोहापाई रंगबेरंगी फुलपाखरे वरचेवर नाचू लागतात. पावसातल्या थेंबाना कधी जमिनीचा तर कधी हिरव्या गार गालीच्याचा आसरा मिळतो. सुर्याच्या कोवळया उन्हात ते जणू हिऱ्या सारखेच भासतात. दाट धुक्यांच्या गर्द आसमंतात कधी तरी मधुनच एखादी सर येते आणि गेले तीन महिने ढगात लपून बसलेले गुढ अजस्त्र कातळ कडे, आभाळस्पर्शी शिखरे, उदरात धडकी भरवणाऱ्या खोल दऱ्या, त्यातून ओसंडून वाहणारे असंख्य धबधबे आणि त्यात लहान लहान ढगांचे पुंजके असा हा सुष्टीचा अनुपम देखावा अचानक दृष्टीक्षेपात येतो. सोबतच इंद्रधनुचे मनोहारी दृश  सुष्टीला खानदानी सौंदर्य प्रदान करीत सप्तरंगाची होळी खेळतात. धबधब्यांचा संथ आवाज, पक्षी व फुलपाखरांची किलकिलाट, वाऱ्याची बेधुंद झुळूक, रानफुलांचा मंद दरवळ, लांब कुठेतरी धुक्याच्या नागमोडी वळणावरुन चाललेली एस टी असा काहिसा लवाजमा अनुभवून मन प्रफुल्लीत होते. असा काहिसा अनुभव घेत आपण एकदाचे गडावर पोहचतो. सर्व साहित्याची सोडबांध होवून चहाच्या प्रत्येक झुरक्यासोबत विश्रांती घेत सायंकाळी ची वाट पहाण नेहमीचच.

 

3 IMG_4323-Edit-3  65

              मग दुपार टळून सुरु होतो तो संध्याकाळचा खेळ. गडावरच्या त्या उंच ठिकाणावरुन दिसाणारे रंगीत क्षितीज, कधी गडत काळे ढग आणि मध्येच डोकावणारी सोनेरी शलाका या सर्वांमध्ये जाणवणारी आमचीच ‘सेफीया सिलोटी’ (outline of a solid figure that appears dark against a light background ) आणि हळू हळू आसमंतात मिसळून जाणारे ते गडद रंग हे जणू निसर्गाची घनताच दाखवतात.

 

4 food - 1024 Compress

5 food1 - 1024  Compress

             अशातच सायंकाळ होऊन सुरु होते ती तयारी पोटपूजेची. स्वता:च बनवलेली खिचडी नाही तर दसऱ्या पर्यत गुहेत आश्रयाला थांबलेल्या गुराखीच्या चूलीवर त्यांनीच रांधलेला खांन्देशी पाववडा, कांदाभजी बरोबर हिरव्या मिरचीचा खुडा नाही नाही म्हणत म्हणत चांगलाच फस्त होतो. मग जेवणात गुराखीचीच टमाटा वांग्याची भाजी, खिचडी व धारोष्ण दुध व त्यासोबत खेकडयाचे कालवण शिवाय पोळा किंवा सणाला खापरावरची पुरणपोळी असा मिष्टांन भोग, या वर उड्याच पडतात. अशा उंचच उंच आणि निेर्जन एकांत वासात असे हे पंच्चपक्वांन्नांचे जिन्नस भाग्यवंतालाच लाभते याची प्रचिती येते. तशातच किर्र रात्रीच्या आंधारात शांततेचा भंग करणाऱ्या बेडकाचा आणि रातकिडयांचा आवाज, रातराणीचा मंद सुगंध, गुलाबी हवा, मोकळे पण चांदण्यांनी भरलेले निरभ्र आकाश, त्याखाली शेकोटीपाशी रंगलेला गप्पांचा फड.

 

6 IMG_4995-Edit-2 60 we

              थकुनभागून गाढ स्वप्नात निवांत झोपलेल्या आपल्या मनाला व शरीराला तसेच ठेवत निसर्ग मात्र पहाटेच्या स्वागताच्या तयारीच्या लगबगीत गडून गेलेला असतो. रात्री सर्व दऱ्या खोऱ्यात गुपचूप सर्व ढग दाटतात ते पहाटेच्या स्वागतासाठी. पहाटे जाग येताच समोर तांबडे फुटलेले असते आणि सहज आपली नजर त्या खाली जाते तेंव्हा मेघांचा महापूर आलेला असतो, जणू नभ उतरू आलं खाली. तशातच गुहेतून बाहेर पडून आपण आसमंतात धावत सुटतो. आकाशातील रंगबेरंगी छताखाली ढगांच्या पांघरुणात असंख्य पर्वतशिखरे न्हावून निघतात, सुर्यनारायणाच्या आगमनाची कोवळी उन्हे प्राशन करत हि मेघ सोनेरी होऊन चमकायला आणि बागडायला लागतात आणि यांच्या खाली असतो तो विविध रंगछटांचा वेड्या रानफुलांचा गालिचा. निसर्गाचे हे दिमाखदार वैभव पाहून,  पहाटेच्या सुंदर नवथर वेळी निसर्ग जणू फुलांनी दृष्ट काढत आहे याचा भास होतो. येवढ करुनही निसर्ग न थांबता आपल्या लिला दाखवत असतो. सुर्य जसजसा वर यायला लागतो तसतसा एक अदभूत चमत्कार पहावयास मिळतो तो म्हणजे ‘इंद्रवज्र’. ‘इंद्रवज्र’ सप्तरंगांची उधळण अगदी मुक्तहस्ते करीत धरती वर नृत्य करत फिरतो.

             निसर्गाच्या दिमाखदार वैभवाचे प्रत्येक पैलू त्याच्या ऐश्वर्यपूर्ण लावण्यासह आपणास विविध रूपांनी अनुभवयास मिळत असतात. हि निसर्गाची अद्धभुत किमया पाहुन हृदयातील बावऱ्या स्पंदनाचा ताल कानी गुंजू लागतो, मग विसर पडतो तो या विश्वाचा आणि…  स्वता:चाही. अशा या श्रीमंतीच्या थाटातून निसर्ग आपणास सांगून जातो की पैशाने नाहीतर मनाने श्रीमंत रहा. ‘जिंदगी लंबी ना हो पर बडी हो’, जीवनातला प्रत्येक क्षण आणि क्षण सृजनात्मक जगावा. असा हा विविध दृश्यांचा मेळ इंद्रधनुष्य, इंद्रवज्र, रंगबेरंब फुले आणि पाखरे, उन व सावलीचा खेळ आणि संवंगडयांसोबतच्या मैफलीत ते तीन चार दिवस कसे रमतात तेच कळत नाही. मग पाय परतीच्या प्रवासाला लागतात,  पाऊले चालत रहातात पण मन मात्र चालत नाही. पाऊलवाटेवर आपली पाऊले क्षणभर थबकतातच… आणि पुन्हा पुन्हा मागे वळून नजरा गडाला न्याहळत बसतात.

              मृगाच्या आगमनाची वर्दी देणारा काजव्यांचा अनोखा प्रकाश उत्सव, त्यानंतरचा मेघांच्या तांडव नृत्याचा जलोत्सव आणि रान फुलांच्या श्रुंगाराने रंगलेला पुष्पोत्सव, यातून येणारा पुढचा टप्पा म्हणजे मेघाचा परतीचा प्रवास. आटलेली धबधबे, कोमेजलेली फुले पाहून मन पावसाच्या विरहाने सैरावैरा धावत सुटते. पण मनाला काय समजवावे पुढच्या पावसाच्या प्रतिक्षेत आठवणींच्या गावी का जावे ? कधी साल्हेरच्या परशुराम टोकावर,  कधी कात्राबाईवर, तर कधी रतन गडच्या नेढयावर बेचैन मनाची पाखरे त्याला शोधत बसतात. हरवलेल्या क्षणांची फिरून पुन्हा साठवण करत पावसाच्या विरहाने ओलावलेले डोळे मात्र रिकाम्या आकाशाकडे एक टक लावून एक टक लावून पाहत राहतात, पण तो काही सापडत नाही. तशातच दुर क्षितीजावर कुठेतरी शेवटचा एक लहानसा ढगांचा पुंजका दिसतो आणि मग, मन त्याला सहजच म्हणते !

              तु फक्त देतच गेला आणि आम्ही फक्त घेतच गेलो

              पण आता मागण फक्त एकच तुज्या पाशी

              सोबत हवी तुजी या जन्माची आणि प्रत्येक जन्मांची

              येशील ना पुन्हा परत लवकरच….

 

आसुओंसे नहेलाया मैंने सावन को ।

यादोंने सहलाया मेरे मनको ।

पानी तो दोनो तर्फ है ।

सिर्फ गिरने और गिरानेमे फर्क है ।

– श्रीकांत शिंपी

 

 ( सदर लेखातील सर्व कविता / गजल आणि मजकूर याचे कॉपीराइट ‘श्रीकांत शिंपी’ यांच्या कडे आहेत  ) 

 

 

_______________________

 

Join Me on FACEBOOK –

 

_______________________