18489645_1465714563505528_8557983618951270539_o

छोड़ आए हम वो हसीं वादीयाँ

असाच एक दिवस मित्राचा फोन येतो आणि तो विचारतो काय प्लॅन आहे? त्यावर मी म्हणतो,
“यायचं का 30 दिवस लडाखला?”
आणि मित्र ताडकन उडतो आणि बोलतो, “30 दिवस आणि तेही हिमालयात ? काय वेड बीड लागलं का ?”

असेच अनेक जण अनेक प्रश्न लोक विचारतात, पण त्या प्रश्नांची भौतिक उत्तर माझ्याकडे कधीच नसतं. मी फक्त आपल्या आवडते म्हणून ती गोष्ट व आपली क्रिया करत जातो आणि त्या अनुशंगाने जे काही घडत ते मात्र अनाकलनीय, अदभूत आणि अव्दितीय असतं.

लहानपणापासूनच बर्फाच आकर्षण काही औरच, चार आठ आण्याचा बर्फाचा रंगीबेरंगी गोळा खाल्लेला , मात्र बर्फाचा संपुर्ण हिमालयच पहाण किंवा त्यासाठी सफर करण हे एक गुढच होय. सहयाद्रीच्या अंगाखांदयावर खेळणारा मी अचानक हिमालयाच्या मार्गी लागणं, जस काही औरच, जस 10 वी पास झाल्यावर अचानक Cambridge सारख्या विद्यापीठात प्रवेश घेतल्या सारखंच आहे.

हिमालयाचे नाव घेताच आपलं मन शून्य डिग्री सेल्सीयस मध्ये रमतं. त्या उत्तुंग पर्वतरांगा, खडकांचे अनेक प्रकार, नाले, झरने, नदीवरील लाकडी पुल, छोटी छोटी गाव, लहान लहान पण मोठया हृदयाची माणसं, ढगांचा तो नयनरम्य खेळ, नितळ जल, बर्फात लुप्त झालेले रस्ते, प्रत्येक पावला गनिक बदलणारे निसर्गचित्र, आकाशातील विविध रंग व शांत तलाव. हिरवळीची मखमाली चादर, छान छान गवत फुले, आक्रोड सफरचंदाच्या बागा, हिमशिखरांवर भुरभुरणारे हिमकण, रंगबिरंगी स्वेटर्स घातलेली मुले, भगवी वस्त्र परिधान केलंली बौध्द भिक्षू, बुध्द जन्माची कथा सांगणारे भित्ती चित्र आणि मॉनेस्ट्री आणि जीवन गोठवणारी थंडी, हे सगळेच अवर्णनीय…

जनजीवन तुरळकच, गरजा अगदी कमी, समुद्रसपाटीपासून अतिशय उंचावर असणारी ही गावं. शेजारीच तिबेट, चीन, आणि त्याहिपलीकडे निसर्गाच्या आपत्तीसह जीवन कंठणारे हे जीवन. तुटपुंज्या शेतीवर सफरचंद, आक्रोड, जर्दाळू, वाटाणा आणि बटाटा अशा चरितार्थाच्या साधनां शिवाय एक महत्वाचं साधन म्हणजे अतिथी देवो भव , ‘पर्यटक हाच देव’ या वर होणारा त्यांचा उदर निर्वाह. प्रगत जीवनच्या पल्याड, तंत्रज्ञाना शिवाय असलेले हे जीवन पण त्यात असलेली निरागसता आणि शांतता व स्मीत हास्य हेच सत्य

हिमालयात प्रामुख्याने बौध्द धर्माचे अनुयाची आहेत. अशी बौध्द देवालये त्यांना मॉनेस्ट्रीज म्हणतात. बौध्द, धिर गंभीर पण अर्धोन्मीलीत डोळे हात, अजान बाहू कानांची पाळी लांब, शांती, अहिंसा परमोधर्माचा संदेश देणारी अशी मंदीरे उंचच उंच शिखरावरील सर्वांत उंच सुळक्यांवर वसलेली हि मॉनेस्ट्रीज म्हणजेच निसर्गाच्या समोर ताठ मानाने उभी असलेली अद्धभुद शक्ती आणि संपुर्ण ब्रम्हांडाचे परिक्षणच जणू तेथून होत आहे.

अशीच साधारण 4 ते 5 वर्षांपूर्वीच Pravin Murkute भेट झाली, त्यानंतर ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. आमची मेत्री घट्ट करणारा धागा म्हणजे ट्रेकींग आणि फोटोग्राफी, आणि मग छोटे- मोठे ट्रेक झाले. अचानक ३० दिवसाचा हिमालयाचा प्लॅन झाला. मनमिळावू, निर्व्यसनी शिवाय शांत म्हणून आमची फारच गट्टी जमली आणि बाईक सह आम्ही सरळ लडाख गाठले. आणि ३० दिवस फक्त आम्ही दोघच एकमेंकांच्या सहकार्यावर होतो.

अशा बाईकींगच्या हिमालय सफरीत अनुभवही तसेच इरसाल. माझी बाईक कमीतकमी 13 वेळा पंक्चर झाली आणि त्यावर कहर म्हणजे तिथील दुकानदार फक्त ट्रक, किंवा जीपचेच पंक्चर काढतात बाईकच पंक्चर आपले आपणच काढावे लागते. त्यातच होंडा शाईन गाडी म्हणजे द्रावीडी प्राणायाम, कारण मागच चाक काढल्यावर अर्धी गाडी खोलल्या सारखी होते. पंक्चरचे कीट सोबतच होते. पण जूना पंचर काढतांना किंवा टायर बदलतांना नवीनच पंक्चर आम्ही करत असू.

अशातच एके दिवशी चायना बॉर्डर जवळ गेलो, आता चायना बॉर्डर म्हणजे काही पाकिस्तान बॉर्डर नाही कारण पाक बॉर्डरला ठिकठिकाणी फेन्स (तारेचं कुंपण) आणि भिंत तरी आहेत पण ‘चायना बॉर्डर’ इथे कसली आली फेसिंग-बिसिंग बर्फाच्या डोंगर दऱ्यात. रस्ता नावाचा प्रकार नाही, जुन्या / आधीच्या tyre marks ला केवळ follow करायचे… वाट चुकलो कि गेलो आपण direct china ला ते ही without पासपोर्ट आणि visa. अंगात मस्ती असल्याने आणि आपण काहीतरी वेगळे केले अशा अविर्भावात आम्ही बॉर्डर जवळून गेलो तशातच प्रवीणची गाडी बंद पडली. झालं आमच्या आनंदावर विरजण पडलं कारण जवळचं छोट गाव साधारण 80 किमी होतं आणि मोठे शहर लेह साधारण 280 किमी होत. प्रसंग बाका होता. रस्त्याविना बंद गाडी माझ्या गाडीला टो करुन नेणं हे एक दिव्यच होतं. कशी बशी गाडी आम्ही त्या गावात पोहोचवली व दुस-या दिवशी टेम्पो करुन लेह पर्यंत घेवून जाण्याचा विचार असतांनाच अचानक गाडी आपोआपच सुरु झाली आणि पुढचा प्रवास सुखकर झाला.

अशीच Pangong Lake ची आठवण सांगतो, तिथल्या हॉटेल वजा घरात आम्हाला मॅनेजरने विचारले, “कितने दिन रहनेका प्लॅन है?” आम्ही सांगितले 30 दिन आणि तो आमच्याकडे पहातच राहिला आणि त्यानेही आम्हाला वेडयातच काढले कारण लडाखच्याच माणसनेही आम्हाला वेड समजाव म्हणजे आमच्या वेडेपणाचा कळसच होय. खरच आम्ही वेडे आहेत की काय? असा उलट प्रश्नआम्हीच आम्हाला विचारला.

लडाख सोडतांना कधी ही न पडलेल्या प्रश्नांचे उत्तर आम्हाला मिळत गेले. निसर्गाच्या या अती भव्यते पुढे आपण किती क्षुद्र आहोत याची जाणिव होत गेली. इतक्या प्रतिकूल परिस्थिती, असहय वातावरणात सुसहय जीवन जगाव कसं? गरजा कमी करुन कमीत कमी साधन सामुग्रीत जीवनचक्र सुरु ठेवणे, त्यातच निसर्गाची मनमानी, आमच्यातला अहंकार आणि मी पणा या हिमालयाने कधीच मोठा होऊ दिला नाही, मोठी झाली ती सहकार्याची भावना आणि वसुधैव कुटूंबकम वृत्ती.

छोड़ आए हम वो हसीं वादीयाँ…

.

 

_______________________

 

Join Me on FACEBOOK –

 

_______________________