11231761_918974934846163_1176563230455006432_o (1)

.

ढगांची ती मखमाली चादर ।

                पहाटे ची ती स्वर्णमयी धुसर।।

पहाडांचा तो राकट सुस्वर ।

        स्वतःला गुंतवून स्वत्वाचा विसर ।।

 .

समोरच अलंग मदन कुलंग व कळसूबाईची अभ्येध्य अशी ही पर्वत श्रृंखला आणि त्याच्या मधोमध रत्नहारात जसा मधोमध पाचू खोवावा, तसाच रतनगड, पांढऱ्या शुभ्र धुक्याच्या मखमाली चादरीतून, तारुण्याने मुसमुसलेल्या पहाटेच्या स्वर्ग तेजाने तळपणारा हा पाषाण मित्र आज जणू निराळाचा होता. कात्राबाईवरून दिसणारे हे विहंगम दृश्य हे अगदी स्वप्नवत वाटत होतं. जणू काही निसर्गाने श्वेत पुष्पांजली वहावी आणि धरतीवर स्वर्गाची रचना व्हावी असा हा दुर्मीळ क्षण. स्वप्नवत दृश्यांचा हा अमृत कलश आणि त्याचा फक्त मी आणि मीच साक्षीदार. तप्त उन्हाळयातील पहाटेच्या वेळी झालेली ही अनुभुती आणि अचानक कुणीतरी दचकून जागे करावे अगदी तसाच मी भानावर आलो.

‘Of course it’s all luck’ हे  शब्द आहेत  ‘Henri Cartier-Bresson’ या महान फोटोग्राफरचे.  हो तसे पहायला गेले तर ‘Photography it’s all about luck’. लास्ट टाइम भर उन्हाळयात मी रतनगडला लागोपाठ सलग ६ वेळा ‘Pre- monsoon फोटोग्राफी’ साठी  गेलो, पण एकदाही DSLR कॅमेरा बाहेर काढला नाही. Pre- monsoon फोटोग्राफी कात्राबाईवरून करावी, अशी खूप दिवसा पासून इच्छा होती पण रतनगड प्रमाणे कात्राबाईला ६ वेळा काय १  वेळ जाणे पण अवघडच . पण पहिल्याच स्वारीत निर्सगाचा वरदहस्त लाभला आणि भर भरून Pre- monsoon फोटोग्राफी झाली.

साधारणत: 2015 चा उन्हाळा असेल. रखरखत्या आणि रणरणत्या उन्हात पळस, बहावा, पांगारा, गुलमोहर, निलमोहर च्या रंगी बेरंगी फुलांच्या सडयात मन रमत नव्हतं. असहय उकाडयात घर सोडून नये असे वाटन असतांनाच शहराच्या या प्रचंड कोलाहलातून मनाला, शरीराला आणि डोळयांना कुठेतरी दूर न्याव याच विचारात असतांना सहयाद्रीच्या या कात्राबाईचा आफबीट असा  ट्रेक  चा प्लॅन झाला.

कात्राबाईचा  ट्रेक  म्हणजे अतिशय अवघड असा प्रवास… पुण्याहून साधारणत: 250 किमी. ओतूर मार्गे जावे. तसे हे ठिकाण ठाणे, नगर, नाशिक व पुणे या जिल्हयांच्या सीमेवरील. रस्ता तसा घाटवाटांचा नेहमीचाच. येथे मध्यावर एका खिंडीत कात्राबाई देवीचे मंदिर आहे.  त्यावरुन या परिसराला कात्राबाईचा डोंगर या नावाने ओळखतात. रतनगडावरून दिसाणारे  कात्राबाईचे कातळ एका शरीरसौष्ठव पुरुषाप्रमाणे मजबूत व स्थैर्यप्रत दिसते. जेव्हा जेव्हा रतन गडाच्या सफरी झाल्या त्या त्या वेळी हा कात्राबाईचा कातळ कडा मला सारखा खुणावत असे.

तसे हे ठिकाण अतिशय दुर्गम व दुर्लक्षीत, कारण नीट रस्ता नाही, पायवाट नाही, वर गेल्यावर पाणीही नाही, ना कोणतीही लेणी ना डोंगर कपारी, ना कोणताही आडोसा. इतक्या उंचावर, शिवाय सोसाटयाचा वाहणारा वारा, त्यामुळे येथे एकही झाड टिकत नाही, फक्त खुरटे गवत, वर निळे आभाळ, अशातही धाडस करुन वर मुक्कामाचा बेत आखला.

दुपारी भर उन्हात साधारणत: 12 वाजता भरउन्हात कुमशेत गावात पोहोचलो आणि वेसीवरच श्वान सलामी झाली. गावकऱ्यां बरोबर सल्लामसलत करुन झऱ्या वरुन 20 लिटर पाणी कॅरी करुन कात्राबाईच्या दिशेने कुच केली. गंमतीचा भाग म्हणजे बॅगेत कुठेही हात घातला तरी पाण्याच्या बाटल्याच हाताशी येत होत्या.

कात्राबाईच्या पायथ्यापासून सुमारे अर्ध्यापर्यत तसं सामान्यच वाट होती. पण शेवटचा काही भाग अत्यंत धोकादायक होता. अत्यंत निसरडा रस्ता, त्यात खांदयावर ओझ, रणरणत ऊन, अंगाची लाही लाही होत असतांना केलेला हा ट्रेक. त्यातच आमच्या आनंदला (Anand Pande)  धीर देत देत अगदी दमान घोडयावर बसवलेला. कुठे जराही निष्काळजी पणा झाला तर थेट दरीतच, त्यामुळे अगदी सावध व सतर्क होवूनच आम्ही एकदाचा डोंगर माथा गाठला.

सायंकाळी पाच च्या सुमारस वरती पाहोचलो. वरच्या मोठया टेबल लॅंड वरुन संपुर्ण 360 डिग्री चे पॅनोरमा व्हयू अतिशय लोभस दिसत होते. पण जसजसा सुर्य मावळतीला चालला होता. तस तसा गार गार वारा वेगात अंगाला चाटून जात होता. पण वरती कोणताही आसरा नव्हता व कोणताही आडोसा नव्हता. तशातच काही दगडांच्या आडोशाला आम्ही आमचा पाल मांडला आणि थोडी उसंत घेतली.

रात्र वैऱ्याची होती… जस जशी रात्र होत गेली तस तशी थंडी अधिकच वाढली, जणू काही भर उन्हाळयात महाबळेश्वर ही फिके पडावे आणि वाऱ्याचा प्रचंड वेग आम्हाला उडवून घेवून जाणारा होता. अशातच आमच्या आनंदचा आनंद केव्हाच पळाला कारण त्याला जवळच एक साप दिसला आणि त्या भितीने तो न जेवताच झोपला.  आदित्य ने थंडीचा असा काही धसका घेतला की अगदी चंबलच्या डाकू प्रणामे मफलर, गमछा आणि शाल नखशिखांत गुंडाळून हुडहुडी रात्र कशी बशी ढकलली. मध्यरात्री  आकाशात स्पष्ट दिसणारी आकाशगंगा आणि अंगा,खांदयावरुन खेळणारे ढग हा  एक थरारक आणि अव्दितीय अनुभव होता.

घडयाळयाच्या काटया मागोमाग वाट पहात असतांनाच अचानक पक्ष्यांच्या किलबीलाट झाला आणि अचानक पहाटेच्या संधी प्रकाशात अचानक समोर अवतरलेला हा नजारा पाहून रात्रीच्यास कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. कात्राबाई पर्वताच्या सफरीत अगदी पहिल्यांदाच असा दुग्धशर्करा योग यावा तसा भाग्यवान मीच. आणि …..

मग या आठवणींच्या आणि स्वप्नानुभवाच्या हिंदोळयातच परतीच्या प्रवासात गुंतलो

.

 

_______________________

 

Join Me on FACEBOOK –

 

_______________________