Great Rann of Kutch (Part 2)

ग्रेट रण ऑफ कच्छ ( भाग 2 )

कालाडुंगर

रात्री साधा 11 वाजले होते, एक छोटे खेड होत. तेथे हॉटेल वैगरे काही नव्हती. एका मुस्लीम खानावळीत कळकट मळकट बाकांवर बसून आम्लेट व रोटी खाल्ले आणि कालाडुंगर साठी पुढे निघालो. जि पी एस बंद पडले, कुठे जावे कोणाला विचारावे? कारण त्या किरर्र आंधारात ओसाड माळरानावर अंधाराच्या वाटेवर बराच वेळ गाडी चालत होती. झोपही लागत होती तशातच काही अधिका-यांनी व जवानांनी आमची गाडी अडवली आणि कुठे जात आहात अशी विचारपूस केली. आम्ही कालाडुंगर बाबत विचारले तर, ते म्हणाले ‘वो तो 35 किमी पिछे रह गया अभी तो आगे पाकिस्तान है, और ये भारत की आखरी  चौकी है’. मग मात्र आमचे बत्ती गुल आणि गाडीचे लाईट लागले आणि परत 35 किमी मागे परतलो.

कालाडुंगर हे एक हिलस्टेशन आहे. एका देवस्थानाचे तेथे मंदिर व धर्मशाळा आहे. अतिशय चिल्ड थंडीत ब्लॅंकेट, रजयी, गादी, व अतिशय छान आणि स्वच्छ खोल्या, शिवाय पहाटे चहा आणि नाश्ता तेथे मोफत होता. डोंगराच्या मागील बाजूस पुन्हा रण होते आणि त्या पलीकडे पाकिस्तान. येथेही सेनेची सॅटेलाईट कम्युनिकेशन यूनिट ची एक तुकडी पहा-याला होती. सकाळी 11 वाजता कालाडुंगरचा निरोप घेवून लखपत किल्याकडे निघालो.

लखपत

मोठया रणाकडे जात असतांना रस्त्यात लखपत नावाचा दुर्ग लागतो. सागर तिरावरील भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील तो शेवटचा दुर्ग होता. आता पडझड झाली असून त्याची तटबंदी प्रचंड मोठी आहे. ओसाड पण कलात्मक असा हा किल्ला शिवाय किल्यावरुन दिणारे अरबी समुद्राचे दोन भाग एकात पाणी आणि दुसरीकडे मिठाचे रण स्पष्ट दिसत होते.  किल्यात लखपत गाव होते ते गाव अगदी भ्यासूर व गुढ वाटत होते. अनेक कबरी तसेच पडझड झालेली छोटी मोठी देवळे, तसेच बरेचशी चांगली घरे सोडून व्यापारी व गावकरी परराज्यात निघून गेली होती. कारण लखपत किना-यावर शेकडो वर्षापासून चालणारा व्यापार, परराष्ट्राचे अतिक्रमण, युध्द यामुळे त्या किल्यावर व तेथील जनजीवनावर वारंवार आघात होत होते.  सायंकाळी साधा 7 वाजले होते. रणाच्या पलीकडे पाकिस्तानचे लाईटस दुरवर दिसत होते. भूक लागली होती, पण लखपत किल्ल्यात हॉटेल वैगरे काही नव्हती. एका गावक-याने सांगितले की येथे एक जुने गुरुव्दारा आहे, तेथे 7 वाजता लंगर असतो तेथे आपण जावे, आपल्याला तेथे जेवण मिळेल. गुरुव्दारा ही अतिशय प्राचीन कौलारु व बाहेरुन पहाता क्षणी  ओसाड आणि भे भ्यासूर वाटणारा पण आत गेल्यावर अतिशय प्रसन्न व शांत वातावरण स्वच्छता. आत गुरु ग्रंथसाहिबांच दर्शन घेवून मौनात बसलो तोच अचानक आमचा दादा खेमचंद बसल्या जागेवर मनातल्या मनात आक्रोश करतांना दिसला आणि पायाची पोटरी दाबत हळूच बाहेर आला. त्याच बरोबर तेथील धर्मगुरु सुध्दा बाहेर आले आणि त्याची विचारपूस करु लागले तो पाय आपटत होता व त्याने न बघताच सांगितले ‘बाबा बिच्छुने काटा है’ कारण विंचू चावल्याचा अनुभव खेमचंद दादाला जुनाच होता. पण आमचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता कारण जिन्स पॅन्टच्या आत विंचू जावून चावेल कसा? पण पुन्हा पाय आपटल्याने एक इंच लांबीचा गव्हाच्या रंगाचा विंचू खाली पडला. धर्मगुरुंनी मंत्र मारुन उतरवला. पण तरीही विषाची परीक्षा नको म्हणून दवाखान्यात नेण्याचा त्यांनी सल्ला दिला. जेवण बाजूलाच राहीले, दवाखाना 80 किमी होता. त्यातही रविवार व सरकारी दवाखान्यातच विंचूचे औषध मिळते. भूपेंद्र ने 1 तासात खडतर रस्त्यातून गाडी चालवून कसाबसा दवाखाना गाठला.  तोवर विंचू कंबरेपर्यंत चढला व कंबर जॅम झाली होती पण औषध  गोळयांनी बराच फरक पडल्याने जीव भांडयात पडला. व रात्री 11 वाजता मिळेल ते खाल्ले व पुन्हा पेट्रोल पंपावर आसरा घेतला.

सकाळी नारायण सरोवर मार्गे भुजला जात असतांना रस्त्यात कर्कवृत्ताची रेषा ओलांडली. भर महामार्गावर एक पाटी होती, ‘येथून कर्कवृत्ताची रेषा गेलेली आहे’ म्हणून आणि त्याच क्षणी इयत्ता चौथीचा भुगोलाचा तास आठवला, पृथ्वीच्या गोलावरील आसाला समांतर उभ्या रेषाचा अर्थ आज उमगला, इतकी वर्ष  कर्कवृत्त आणि विषववृत्त फक्त काही रेषाच होत्या. तसंच पुढे जात असतांना महामार्गालगतच पुनवरेष्वर हे शंकराचे प्राचीन पण भग्न मंदिर दिसले. भग्न असूनही आमचा दादा तशा मंदिरात नेहमीच मग्न असतो. दुपारी साधा 2 वाजता भुज गाठले आणि राजवाडयात गेलो. पण नशिब एक पाऊल पुढे. सुटीचा दिवस असल्याने सर्व काही बंद. म्यूझीयम, राजप्रासाद आणि इतर ऐतीहासीक वास्तू, पण तेवढयावर न थांबता बाहेरुन जे काही दिसेल ते डोळयात व कॅमे-यात साठवत सायंकाळी भुज सोडलं आणि कच्छ पासून दूर दूर जात पुन्हा आमच्या वाटेला लागलो.

राणी की वाव, पाटण

पाटण

पाटण तसं फक्त पटोलासाडी साठी प्रसिध्द अशी त्याची ओळख, पण तेथील सोलंकी राज्यांच्या राजवटीत निर्मीलेल्या अनेक कलात्मक वास्तू आजही आपली वाट पहात आहे. पाटण गाव तसं पुण्यासारखं खवैये छोटया छोटया गल्ल्यातून दाबेली, नमकीन, चाट, उंधीयो, ढोकलो, देसी घीकी जलेबी असा काहीसा श्रीमंत आहाराचा त्यांचा तोरा, त्यात पटौला साडीतर जणू चार चाँद आणि त्यावर कडी म्हणजे तेथील प्रसिध्द अशी वास्तू म्हणजे ‘राणी की वाव’.

‘वाव’ म्हणजे विहीर, आपण आजवर विहीर फक्त पाण्याच्या पाहिल्या. अहिल्या बाई होळकरांच्या विहिरी पाय-यांच्या आहेत, इथवरच आपलं ज्ञान. पण या ‘राणी की वाव’ विहिरीत अंडरग्राउंड 7 मजली इमारत असते आणि तीही नखशिकांत, त्यातही भल्यामोठया पाय-या, अनेक खांब आजच्या सिमेंटच्या युगात बिम कॉलमशी साम्य असणारे रचनात्मक कौशल्य. शिवाय भिंती, खांब, कोनाडे, पाय-या शिवाय काही ठिकाणी सिलींग यावर म्यूरल प्रमाणे लटकती, पाठीमागुन चिटकलेली संपुर्ण उत्थीत अशी शिल्पे तेही अतिशय बांधेसूद, प्रमाणबध्द सौंदर्य, शरीरसौष्ठव व नवरस निपुण अशी मानवाकृती शिल्पे. हा सर्व साज श्रृंगार आपल्याला त्या राज्यांच्या कलात्मकतेची आणि सुजलाम सुफलामतेची साक्ष पटवून देतो.

अशा सर्व आठवणीचे बिढार मनाशी बाळगुन, धोलाविराच्या त्या भुमीला वंदून गुजरातच्या दुधातुपाच्या भुमीतून परत रांगडया सहयाद्रीकडे येतांना पाउले जड होत होती. पण शेवटी प्रवास त्यालाच म्हणतात जो संपणार असतो, कारण थांबणारा हा प्रवासी नसतो.

 

ग्रेट रण ऑफ कच्छ – भाग १ साठी येथे क्लिक करा / For Part II Click here

ग्रेट रण ऑफ कच्छ ( भाग १ )

_______________________

 

Join Me on FACEBOOK –

 

_______________________